Saturday 6 December 2014

अभ्यासाच्या सवयी

                                  अभ्यासाच्या सवयी


     माझा अभ्यास का होत नाही ? माझे मन का लागतं नाही ? माझ्या डोक्यात पाठांतर का बसत नाही ? इ. अनेक प्रश्न हे आपले असतात. हे सर्व प्रश्न आता आपले सुटतील. प्रा. आरती पसारकर याचं मानसशास्त्रीय मदतीवर आधारित ' एक हात मदतीचा ' हे पुस्तक आहे. याच पुस्तकातील एक निवडक भाग मी लिहितोय. याचा तुम्हाला पुरेपूर फायदा होईल. 
     बऱ्याचदा असं दिसून येत की विद्यार्थी महत्त्वाच्या परीक्षामध्ये त्यांना हवे तसे गुण मिळवण्यात यशस्वी होत नाहीत. असं ऐकायला मिळत की ' मी खुप अभ्यास केला होता '. पण माहित नाही मला चांगले मार्क्स मिळाले नाहीत. माझं नशीबच ख़राब आहे. शेवटच्या क्षणी मी सगळं विसरलो. पालक ही तक्रार करतात, मुलांची तुलना करतात की माझ्याच मुलाला एवढे कमी गुण का मिळाले ? आणि मग ही पूर्ण चर्चा शैक्षणिक पद्धती वर येउन ठेपते. परिक्षांचा प्रकार, प्रारूप, शाळा - महाविद्यालय, बरोबर शिकवतच नाहीत इ. काही मुद्दे बरोबर ही असतात. परंतु कुठेतरी विद्यार्थ्याची जबाबदारी ध्यानात घेतली पाहिजे. खरं म्हणजे या सर्वांचा मूळ मुद्दा अभ्यास करणं म्हणजेच नुसती घोकंपत्ती किंवा अतिपरिश्रम नसून योग्य पध्दती तत्त्व आणि डावपेचांचा वापर करण होय. हे एक नियोजनबध्द, संघटित आणि उद्देशप्रणित प्रयत्न असले पाहिजेत.
     सुरुवात आपण अशी करुया की तुम्ही काय वाचलंत. त्यातलं किती समजलं आणि आता किती लक्षात आहे? नेपोलियन म्हणालाच आहे की, कुठलही युद्ध जिंकायच्याआधी मी ते माझ्या डोक्यात जिंकलेलो असतो.
     ध्येय निश्चिती :- अभ्यासाला लागायच्या आधी हे नक्की माहित असलं पाहिजे की मी अभ्यास का करतोय? मला नुसतं पास व्हायचंय की चांगले गुण मिळवायचे आहेत ? उदाहरणार्थ, सुरुवातीलाच जर एखाद्या विद्यार्थ्याने असं ठरवलं की मला कमीत कमी 60 टक्के गुण मिळालेच पाहिजे. तर मग हे त्याच्या डोक्यात भिनत आणि त्या प्रमाणे प्रयत्न करतो.हळूहळू हे ध्येयच त्यांची प्रेरणा बनतं आणि मेंदू एक प्रकारचं स्व-सूचना ( ऑटो सजेशन ) देण्याचं काम करतो परंतु या बरोबरच एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या कुवती प्रमाणेच लक्ष निर्धारित करावं म्हणजे ते वास्तवाशी मिळत जुळत असावं अन्यथा यातून वैफल्य येण्याची शक्यता असते
     अभिवृती :- ध्येयप्राप्तीमध्ये सकारात्मक दृष्टिकोण ठेवणं महत्वाचं आहे. मी हे करू शकतो, मला हे करायचं,मी हे करणारचं, परिणामांची  चिंता करत बसण्यापेक्षा ,ध्येय आणि त्यासाठीचे प्रयत्न यावर लक्ष केंद्रित करायला हवं, जर अपयशाचाच विचार करत बसलो. तर मग त्यामुळे चिंता वाढते आणि त्याचा परिणाम आपल्या कामगिरीवर होतो.
     वेळेचं व्यवस्थापन :- अभ्यासाचा  एक तक्ता तयार करावा, असा कि जो तुम्ही अंमलात आणू शकता. विभिन्न विषय आणि त्यासाठी लागणारा वेळ या निकषावर आधारित तक्ता तयार करावा. त्याचप्रमाणे परीक्षेच्या आधीसुद्धा आपल्याला किती विषयांचा किती दिवसात अभ्यास करायचा आहे? रोज आपण किती तास अभ्यास करू शकतो ? सरावासाठी किती दिवस ठेवायचे ? यावर तक्ता बनवू शकतो.
     अभ्यास हीच माझी नोकरी : तुम्ही असं समजा कि एखाद्या शाळेत किंवा महाविद्यालयात तुमची विद्यार्थी म्हणून नेमणूक झाली आहे.अभ्यास हे तुमचं काम आणि मार्क्स हा तुमचा पगार. तेव्हा प्रभावीपणे, कुशलतेने काम करा आणि प्रत्येक पुढच्या परीक्षेत तुमचा पगार म्हणजेच मार्क्स वाढतील असं बघा.हे करत असताना तुम्ही जिथे अभ्यासाला बसणार आहात त्या जागेचा, तेथील प्रकाश, अडथळे, लागणार साहित्य इत्यादीचा विचार करावा .
     अभ्यासात व्हिज्युअलायझेशन, साहित्याची नीट मांडणी, विस्तृत सराव, प्रस्तुतीकरण अशा काही पद्धती वापरता येऊ शकतात. आतापर्यंतच्या अभ्यासाचा आढावा घ्या आणि ठरवा कि अजून किती अभ्यास बाकी आहे ? आणि कुठल्या विषयाच्या अभ्यासाला अजून जास्त तयारीची आवश्यकता आहे?
     अति अध्ययन  ही सुद्धा एक पद्धत आहे. ज्यामुळे विस्मरणाची शक्यता कमी होते.
     नोट्स काढणे : वर्गात शिकत असताना नोट्स घेणं आणि काढणं खूप महत्वाचं ठरत. जेव्हा शिक्षक शिकवत असतात तेव्हा तुम्ही काय करता ? तर त्यावेळेस नोट्स आणि महत्त्वाचे मुद्दे लिहून घेतले पाहिजेत ज्याचा नंतर सुचके म्हणून उपयोग होऊ शकतो.
     परीक्षा : परीक्षा जवळ आल्या कि तुमचा अभ्यास झालेला असला पाहिजे. तुमचं अभ्यासक्रम, महत्त्वाचे प्रश्न, प्रश्नपत्रिका सोडवणं, वेळेत उत्तर लिहिण्याचा सराव हे सर्व केलं  आहे का ? जुन्या प्रश्नपत्रिकावरून तुम्ही स्वतःचा अपेक्षित संच काढू शकता. तुम्हाला हे प्रश्न सोडवता येतात का ? जे कठीण वाटतात त्यांचा पुन्हा निट अभ्यास आणि सराव करावा.
     आता तुम्ही परीक्षेच्या ठिकाणी आहात. आधी प्रश्नपत्रिका नीट वाचा. गरज भासल्यास अजून एकदा वाचा. आता कुठले प्रश्न सोडवणार ते ठरवा. त्याचा क्रम ठरवा. तुमचं पहिलं उत्तर उत्कृष्ट असलं  पाहिजे. प्रत्येक प्रश्नासाठी लागणार वेळ ठरवा आणि त्याप्रमाणे त्या वेळेस प्रश्न पूर्ण होतोय कि नाही ते बघा. कमीत कमी ५-१० मिनिट आधी तुमची सर्व प्रश्नपत्रिका सोडवून झाली असली पाहिजे. या उरलेल्या वेळात सर्व नीट तपासून पहा, काही राहून गेलं असल्यास ते पूर्ण करता येऊ शकतं.
     हे सर्व करत असताना आपली तब्येत सांभाळणं ही तितकंच महत्त्वाचं असतं. बरेचशे विद्यार्थी परीक्षेच्या काळात रात्री जागरण करतात, नीट खात पीत नाहीत आणि पित्ताचा वैगेरे त्रास होतो. यासाठी ही त्रिसूत्री पाळावी.
                   विश्रांती +व्यायाम +आहार
     याशिवाय जसे तुम्ही परीक्षेच्या खोलीत शिरता आणि आपल्या जागेवर जाता, तेव्हा आधी थोडं पाणी प्या आणि मग लागणार साहित्य काढून ठेवा. यश तुमचंच असेल.
     यश मिळण्याची इच्छा, अपयशाच्या भीतीपेक्षा जबर असली पाहिजे.       

Monday 24 November 2014

व्यसनमुक्ती काळाची गरज

                                व्यसनमुक्ती काळाची गरज 

     

 आजची तरुणाई हि खरचं खूप व्यावहारिक, हुशार आणि आपल्या करिअर बद्दल वास्तववादी आहे. भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत चीन नंतर दुसऱ्या क्रमांकावर असून इथल्या कृतीशीलतरुणांची वाढती संख्या आणि त्याच्या उत्तरोत्तर होणारी प्रगती हि खरचं अभिमानास्पद गोष्ट आहे. तंत्रज्ञान आणि वाढत्या स्पर्धेमध्ये विविध क्षेत्रांशी, देशांशी संबंध जोडणारी हि पिढी भारताला प्रगतीपथावर नेण्यासाठी उत्तम कामगिरी करतेय यात वाद नाही . या स्पर्धेत जात, वर्ग, वंश, शहरी, ग्रामीण, असा तुरळक भेद जरी आढळत असला तरी स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्याची हि मुख्य लढाई आहे हे वास्तव दररोज नजरेस पडत असतं. पण या सर्व प्रवाहात येणाऱ्या ताणतणावाला तितक्या सक्षमपणे हि पिढी हाताळताना दिसतं नाही. 
          स्पर्धेच्या युगात कामाला असणारा भरमसाठ व्याप आणि येणाऱ्या एकटेपणा स्वप्नांच्या आधारे दूर करण्याची सवय आजकाल कित्येकांना लागलेली दिसते. आजच्या पिढीतील कित्येकजण व्यसनेच्या अधीन गेले आहेत. नातेसंबंध जबाबदारी आणि वाढत्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे हि पिढी व्यसनाधीन झाली आहे. करिअरच्या मागे धावण्यात अधिकाधिक वेळ जात असल्याने या पिढीच्या वैयक्तिक  आयुष्यात बरीच हालचाल होताना दिसते. त्यामुळे हि पिढी कुठेतरी मानसिक आधार शोधण्यासाठी प्रयत्न करत आहे. हा मानसिक आधार कशातच मिळाला नाही  तर ते व्यसनाच्या आहारी जातात. अनेक वेळेस परस्परांमध्ये होणारे मतभेद गरजांची अपूर्णता, शौक म्हणून व्यसन केलं जात, पण काही काळानंतर हे व्यसन हे त्याच्या आयुष्यांच्या अविभाज्य भाग बनतो. संपूर्णपणे व्यसनांच्या आहारी गेलेले आहेत त्यांची जाणीवही त्यांना होत नाही . 
          अंमली पदार्थाचं सेवन करन, धुम्रपान करण, मद्यपान करण, हे काही निव्वळ श्रीमंत वर्गा पुरत मर्यादित नाही तर ग्रामीण भागात सुद्धा तरुण मोठ्या प्रमाणावर व्यसनात आकंठ बुडालेले आपल्याला पाहायला मिळतात. या तरुणांसाठी अनेक वेळा शहरापासून थोड्या दूर असलेल्या पब्ज, डिस्को किंवा हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर पार्ट्या आयाजित केल्या जातात. या रेव्ह पर्त्यामध्ये तसचं नवीन वर्षाच्या स्वागतांसाठी आयाजित केलेल्या पार्ट्या मध्ये तरुणांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकार पॅकेजेस दिली जातात . या पार्ट्या मध्ये केवळ तरुणांना दारू दिली जाते असं नाही तर या पार्ट्या द्वारे तरुणांना सहज अंमली पदार्थ पुरवली जातात. या अंमली पदार्थाची विविध भागातून आयात केली जाते आणि या पदार्थांचं सेवन करण्यात तरुणांना भाग पाडले जाता. एकदा का तरुणांना या अमली पदार्थ घेण्यात त्यात असतात. 
          आज खूपच कमी वयात व्यसनाधीन झालेली मुल आजकाल मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. शाळेमधील विद्यार्थ्यालाही अंमली पदार्थाची सवय लागल्याच्या अनेक घटना आहेत. केवळ हौस म्हणून अमली पदार्थाचं या मुलांकडून सेवन केलं जात आणि नंतर हि मुल संपूर्णपणे या पदार्थाच्या आहारी जातात . . अनेकदा फ्रेंडशिप क्लबच्या नावाखाली तरुण-तरुणीना आर्थिकदृष्ट्या लुबाडलं जात, तर काही वेळा या माध्यमांतूनही हे अमली पदार्थ विकले जातात. आज गांजा, हेरोईन , अफू यासारख्या पदार्थाची मागणी युवकांमध्ये वाढत आहे आणि हे त्यांना गुप्तपण पुरावालेदेखील जाताहेत. 
         मद्यधुंद अवस्थेत अनेकवेळा या मुलांकडून गंभीर गुन्हे घडतात. तसचं ते मुलीसोबत गैर वर्तन  करतात. अंमली पदार्थ विकत घेण्यासाठी अनेक वेळा त्याच्याकडून चोरी, दरोडे , खून याच्यासारखे गुन्हे घडतात. त्यामुळे या अंमली पदार्थामुळे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. भारत देश हा तरुणांचा देश म्हणून संबोधला जातो. पण जर तरुण मोठ्या प्रमाणावर व्यसनाच्या आहारी जात असेल तर कोणत्या प्रकारे त्या देशाची प्रगती घडू शकेल? त्यामुळे अशा पिढीचा देशाला काही उपयोग होईल का हि शंकाच आहे. महाराष्ट्र राज्याने गेल्या कित्येक वर्षापासून व्यसनमुक्तीसाठी विविध उपक्रम हाती घेतले पण व्यसनमुक्त भारत निर्माण करण्यासाठी निव्वळ योजना राबवून उपयोग नाही. तर या पिढीची क्मानासिकता बदलण्यासाठी गरज आहे. कोणत्याही कठीण परिस्थितीचा  सन्मान कराण्यासाठी त्यांना तयार करण्यासाठी आवश्यकता आहे. आयुष्यात नातेसंबंधातील ताणताणाव दूर करण्यासाठी व्यसनाचा आधार घेण्याची गरज हे त्यांना पटवून देण्याची गरज आहे तसचं अनेकवेळा सोशल मिडीयाच्या माध्यमातून रेव्ह पार्ट्या, आयोजन केले जात त्यामुळे सायबर गुन्हे विभागाने याकडे लक्ष दिल पाहिजे. व्यसनमुक्तता हे काही एका दिवसाचे काम नाही, पण योग्य मार्ग अवलंबून तरुणांना या व्यसनांच्या जाळ्यातून मुक्तता मिळवून दिली पाहिजे .





Monday 20 October 2014

शालेय शिक्षण





               लहानपणी मला शाळेतील दिवस आठवतात. अंगणवाडीचा पहिला दिवस. तेव्हा काही मुलांना इतका आनंद होता कि जणू आपण कुटे तरी दूर फिरायला जातोय. पण काही मुलं इतकी रडतात कि त्यांना वाटत कि आपल्याला कुटे तरी घरापासून दूर घेऊन जातायत आणि एका खोलीत डांबून ठेवतायत. काही मुलं ही हसत खेळत जातात. काही मुलांना असे सांगितले जाते कि शाळेत छान छान खाऊ मिळतो. मग ती हसत खेळत जायला निघतात. काही मुल हि शाळा डोक्यावर घेतात. शाळेमध्ये एकच आवाज घुमत असतो, तो म्हणजे रडण्याचा. मुलांचा रडवेला चेहरा बघून खूप वाईट वाटते, कारण त्यांना असं काही जबरदस्तीने शाळेत बसवले जाते कि जणू एखाद्या गोठ्यात गुरे बांधलेली असतात त्या प्रमाणे वाटते.   
               अहो हे कशाला तुम्हाला माझंच उदाहरण देतो. मी देखील जेव्हा लहान होता तेव्हा शाळेत जाताना खूप रडायचो. शाळेची वेळ जवळ आली कि माझ्या पोटात दुखायचे. माझे अंगणवाडी ते १० वी पर्यंतचे शिक्षण हे माझ्या आजोळात पार पडले. माझे आजोबा मला मारत झोडत शाळेत घेऊन जायचे. ते माझ्या बाजूला ६ महिने शाळेत बसले होते. माझ्या शिक्षणात माझ्या आजी आजोबांचा सिंहाचा वाटा आहे.
               आजकाल मिळणारी चित्रांची पुस्तक जशी असतात ती तशी का बर असतात ? याचं साधं उत्तर आहे ते म्हणजे शिक्षणाचं झालेलं व्यवहारीकरण किंवा व्यावसायिकीकरण. चित्रात जर तबेल्यात उभा असलेला घोडा दाखवला तर पुस्तकाची दृश्य स्वरुपाची पात्रता (Quality) कमी होते आणि त्यामुळे त्या पुस्तकाची किंमत देखील कमी होते. पुढे  जाऊन म्हणायचं तर जास्त किंमत असलेलं पुस्तक जर पालकांनी खरेदी केलं नाही तर त्यांना मुलांसाठी काही केल्याचं समाधान मिळत नाही यामागे मानसिकता अशी आहे की जर काही पालक मुलांसाठी वेळ खर्च करू शकत नसतील तर त्यांना गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करून त्यात समाधान मिळवावं लागतं.
               एखाद्या वेळेस मुलांना एखाद्या प्राण्याचे चित्र दाखवले तर तो म्हणेल कि हा प्राणी कोण आहे त्याला जर माहीत असेल तर चटकन उत्तर देईल नाही तर माहित असल्यास सांगू शकतो कि घोडा आहे. मग मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात कि तो काय खातो ? काय पितो ? कोठे झोपतो ? त्याला पाय किती ? शेपूट किती ? इ. प्रश्न विचारतात असं केल्याने मुलं स्वतःहून शोध घेऊ लागतात. हा शोध सुरुवातीला उपलब्ध असलेल्या ज्ञानाशी निगडीत असतो जो पुढे जाऊन नवीन शोध घेण्याकडे म्हणजेच उपलब्ध ज्ञानात भर टाकण्याकडे वाटचाल करू लागतो. समोरील प्राण्याला किंवा वस्तूला काय म्हणतात किंवा जी काही म्हणतात ते ओळखण यासं ज्ञान संपादन करणं म्हणतात. परंतु ज्ञान मिळवण हा शिक्षणाचा केवल एक भाग आहे. शिक्षणाचा खरा हेतू आहे तो म्हणजे शोध घेणं आणि घेतलेल्या किंवा लागलेल्या शोधाची चिकित्सा करण्याची प्रवृत्ती निर्माण करणं. आजकाल जे शिक्षण आहे ते पूर्णपणे व्यावहारिक किंवा व्यावसायिक शिक्षण आहे. त्याचा पूर्ण भर हा निव्वळ ज्ञान, निव्वळ यश, निव्वळ पदवी, निव्वळ हुशारी, निव्वळ मोठेपणा, मिळवण्याचा आहे.
               अर्थात, शिक्षण हा विषय एवढाच मर्यादित नाही तर पुढे  जाऊन खूप व्यापक आणि तितकाच गंभीर देखील आहे. शिक्षणातील यश-अपयशाशी संबंधित असलेला ताण तणाव, मुलांमध्ये वाढत जाणाऱ्या ताणतणावांमुळे होणाऱ्या आत्महत्या, शिक्षणसंथ्येकडून मागितली जाणारी भरमसाठ फी \शुल्क वैगेरे, एकंदरीत शिक्षणांच झालेलं बाजारीकरण आणि त्या बाजारीकरणाला मिळालेलं अवास्तव महत्त्व याला आपण बळी तर पडत नाही ना याचा विचार प्रत्येक पालकाने करण गरजेचं आहे.


               शाळेची गरज उरली नाही तर काय होईल ? आता शाळेत नक्की कोणतं शिक्षण दिलं जात आहे ? शाळा हा एक केवळ दिखावा झाला आहे का ? नक्की शाळेत जे दिलं जातं त्याला शिक्षण म्हणता येईल का ? शाळेत होणारे बदल नेमके कुठल्या दिशेने जात आहेत ? मुळात मुलांनी शाळेत नेमकं का जायचं, हे सगळ्या घटकापर्यंत पोहोचवलं आहे का ? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. या प्रश्नांचा सर्वांनी विचार करावा आणि आपापल्या मुलांना चागले शिक्षण दयावे  आणि त्याच आयुष्य उज्ज्वल बनवावं आणि समाजात त्यांची ख्याती वाढावी हि आपणास  विनंती !

Thursday 16 October 2014

वाचतो कोण ?

                                                 वाचतो कोण ?


        आजकालच्या  यंग पिढीचे वाचनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे . त्यांना शोर्ट मध्ये  वाचन करायला आवडते . आज बघायला गेलो  तर तंत्रज्ञानाचे युग आहे . facebook , twitter , whatsaap , इत्यादी साईट्स कॉम्पुटर आणि स्मार्टफोनवर उपलब्ध असतात . या साईटवर शोर्ट मथळा वाचण्याची सवय सर्वांना लागलेली आहे . मराठी चित्रपट कलाकार किती वाचतात , काय वाचतात , कशाला वाचतात , असे अनेक प्रश्न निर्माण होतात , वाचतात म्हणजे नेमके काय ? कथा , कादंबरी , आत्मकथन , चरित्रकथन , कवितासंग्रह , अशा वाचनाबाबत हा प्रश्न आहे कि , प्रसारमाध्यमांबाबत हा प्रश्न आहे ? म्हणजे वृत्तपत्र । साप्ताहिक । मासिक । वार्षिक । दिवाळी अंक । याचं वाचन म्हणायचं कि मोबाईल वरचे sms , न्यूज वाचन म्हणायचं ? 
          आगामी चित्रपटाची पटकथा वाचन नाटकाची संहिता वाचन हे देखील वाचनच ! 
          आज इतकं गतिमान आयुष्य आणि त्यात शेकडो काम , त्यातून नेमकं कलाकार वाचन  तरी कधी करणार आणि वाचायचं म्हटले तर नेमके काय वाचन करायचे ते ठरवणार ? वर्तमानपत्राच्या मुख्य महत्त्वाच्या बातम्याचे मथळे देखील वाचायला वेळ नाही अशी अनेक कलाकारांची परिस्थिती आहे . चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अत्यंत गोड मुलाखतीच वाटप करण  , न कंटाळता तेच तेच करण , आपल्याकडे येणारी 'सुपारी' दुसरीकडे जाऊ नये याची काळजी घेण , अशा असंख्य गोष्टीत वाचणार ते कधी आणि किती यापेक्षा वाचायला ते कशाला ? असा काय मोठा स्वतःच्या आयुष्यात बदल घडवतोय अशा भावना निर्माण होते. 
          वाचनाने भाषा सुधारते , आत्मविश्वास वाढतो , व्यतिमत्त्वात प्रगल्भता येते , अभिनयाची त्याचा खोलवर फायदा होतो. असे म्हटल्यावर काही कलाकार म्हणतात कि पन्नाशीनंतर ठीक आहे हो , आता कशाला ? 
          मग वाचन कोणत्या पातळीवर राहत ?
          स्वतःच्याच नाटक - चित्रपटाची परीक्षण वाचायचे हि कष्ट फार कमी कलाकार घेतात. करणार्यांना माध्यमातील काही समजत नाही असे समजले जाते . 
          पानोपान मजकूर वाचण्यापेक्षा whatsaap वरचा शोर्ट मजकूर खूप चांगला वाटतो. मुद्दा समाजाला न मग बस्स अस म्हटलं जात. मराठीत भरपूर साहित्य आहे. पण त्यावर नजर टाकण्याची इच्छा हवी. त्यासाठी स्वतःचा वेळ स्वतःच्या जडणघडणीसाठी घ्यायची भावना हवी. स्वतः वाढलो तर कोणी धक्का देत नाही , त्याचा एक मार्ग वाचनातून जाते.
          सदाशिव अमरापूरकर , सचिन खेडेकर , उपेंद्र लिमये , अतुल कुलकर्णी , मिलिंद गुणाजी , सुबोध भावे , जितेंद्र जोशी , मृणाल कुलकर्णी , सोनाली कुलकर्णी (ज्येष्ठ ) , अमृता सुभाष , मिलिंद गवळी , हे जास्त चांगले वाचक म्हणून ओळखले जातात . या प्रत्येकाच्या प्रगती पुस्तकाबाबत पुन्हा वेगळे काही सांगायला नको . या प्रत्येकाने अभिनय क्षेत्रात फार मोठी कामगिरी केली आहे . पण वाचनाने त्याच्या वागण्यात -विचारात , दुष्टीकोनात भरपूर बदल येत गेला . तो त्याच्याच पथ्यावर पडला . वर्षा उसगावकर , निशिगंधा वाड , मकरंद अनासपुरे , अशी हि यादी वाढवता येईल , सेटवर अथवा कुठल्याही अन्य जागी पुस्तक वाचले म्हणून आपण  जुनाट झालो असं नाही . पण त्यासाठी स्वतःवर लक्ष हवं .
           
             मराठी चित्रपटसृष्टीच्या ' कॅ^लिडोस्कोप ' मध्ये वाचन या प्रकाराला कोपरा मिळालाय , यातच बरेच प्रश्न पडतात , उत्तर न मिळणारे ………
          अशा  प्रकारे प्रसंगी अखंडीत वाचत जावे। असे समर्थ रामदास स्वामीनी यांनी सांगितले आहे . वाचनाने खूप ज्ञान मिळते . पुस्तक हे आपले दुसरे गुरु असतात . त्यामुळे आजकालच्या मुलांनी खूप वाचावे आणि आपले चांगले व्यतिमत्त्व घडवावे .   

Monday 13 October 2014

पंचरंगी राजकारण

       

                            महाराष्ट्रातील पंचरंगी निवडणूक 






   शिवसेना - भाजप गेले २५ वर्षे युती होती. ही युती बाळासाहेब ठाकरे आणि  प्रमोद महाजन यांनी घडवून आणली. कालांतराने प्रमोद महाजन यांचे आकस्मित निधन झाले.त्यानंतर ही बाळासाहेबांनी ही युती कायम ठेवली होती.पण आता बाळासाहेब हे देखील नसल्यामुळे युती तोडली गेली.युती तुटण्याचे  खरे कारण हे भाजपच आहे असे आरोप हा शिवसेनेने केला आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी याची आघाडी ही १५ वर्षाची होती. ही आघाडी शरद पवार व सोनिया गांधी यांनी घडून आणली होती. पण आताच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी युती तुटल्या बरोबर आघाडी ही तोडली गेली.
          महाराष्ट्रामध्ये २५ वर्षानंतर पंचरंगी निवडणूक होणार आहे. पंचरंगी निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे प्रमुख पाच पक्ष आता पुढे उभे राहिले आहेत. या पाचही पक्षामध्ये अतितटीची स्पर्धा लागलेली आहे. अनेक पक्षांच्या सभावर सभा महाराष्ट्रात होत आहेत. त्यामुळे ही निवडणुका कोण जिंकणार आणि कोणाचा मुख्यमंत्री होणार याकडे सगळ्यामुळे लक्ष लागलेले आहे.
          सध्याची स्थिती पाहता असे दिसून येते कि भाजप हा सर्वत स्वबळावर लोकसभेत बहुमताने निवडून आलेला पक्ष आहे. भाजपाने जी काही मेहनत केली होती, ती पणाला लावून बहुमताने मोदी यांना जिंकून पंतप्रधानाच्या पदी बसून दिले. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदी  यांनी स्वतः पूर्ण देशात  ३०० हून  जास्त सभा घेतल्या होत्या.त्यांनी आपला चेहरा आणि गुजरात मॉडेल हे लोकांच्या डोळ्यात सारखे बिंबवत होते. त्यामुळे त्यांना याचा फायदा हा  लोकसभेत चांगला झाला. पण आताही विधानसभा निवडणुकीत भाजपाने हेच सूत्र हाती घेतले आहे. म्हणजे थोडक्यात मोदींना पुढे केले आहे. तसे पाहता शिवसेना बाळासाहेबांपासून ते आता उद्धव ठाकरे पर्यंत असे दिसून येते कि महाराष्ट्रात शिवसेनेचेच वर्चस्व आहे.
          भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे मोठ्या प्रमाणात प्रचार करताना आपल्याला  महाराष्ट्रात दिसतात. मोदी यांनी आताच अमेरिका दौरा करून आले आहेत तेव्हा त्यांनी असे वक्तव्य केले होते कि मी महाराष्ट्रात २० ते २५ प्रचार सभा घेणार हे त्याचे सभा सत्र अखंड चालू असल्याचे आपल्याला दिसतंय.मोदीमुळे भाजपचे पारडे जड आहे असे  दिसून येते.
          काही  लोकांचे असे मत दिसते कि भाजप ही स्वार्थी आहे. कारण शिवसेनेबरोबर २५ वर्षाची युती होती जेव्हा लोकसभेत भाजप स्वबळावर निवडून आली. त्या नंतर त्यांना शिवसेना जड वाटू लागली मग शिवसेने बरोबरचे कायमचे संबंध तोडले. शिवसेना ही काही use  and thro वस्तू नाही आहे, असे लोकांनी भाजपला करारा जवाब विचारलेला आहे. भाजपचा लोकसभेतील विजय पाहता त्यांना आता असे वाटू लागले  ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही स्वबळावर जिंकून येऊ असा भाजपचा हट्टाहास दिसून येतो.
          शिवसेना आणि भाजपची युती संपुष्टात आली. तसा रिपाई पक्षाने देखील शिवसेनामधून आपला काढता पाय घेतला.भाजपच्या गोठात सामील झाले. आठवले यांचे असे म्हणणे आहे कि आम्हाला इतकी वर्षे शिवसेने काहीही दिलेले नाही मग आंम्ही का राहू. आम्ही तुमचा पाठिंबा सोडतोय. जो पक्ष आता आम्हाला साथ देईल त्याच्याच मागे जाऊ असे रामदास आठवले यांनी वक्तव्य केले. पंचरंगी निवडणूक असल्यामुळे सर्व पाच हि पक्ष आपली ताकद पणाला लावून आणि स्वबळावर निवडून येण्याचा खूप प्रयत्न करतायत. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीचा निकाल हा धक्कादायक असणार आहे.
          शिवसेना हिंदू दृदय सम्राट असे ओळखले जाणारे बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा होते तेव्हा शिवसेनेकडे मोठी शक्ती होती. पण त्याचे निधन झाल्यावर अनेक जणांना असे वाटत होते  बाळासाहेब गेले आता शिवसेनेचे काय होणार उद्धव ठाकरे ह्यांच्यावर लोकांचा विश्वास नव्हता त्यांना असे वाटले कि आता शिवसेना संपुष्ठात आली. उद्धव ठाकरेंनी हा लाकांचा विश्वास खोटा  ठरवून आपली एक वेगळीच इमेज निर्माण केली आहे तर आता असे दिसून येते कि शिवसेना हि संपुष्टात नाही येणार. शिवसेनेला कणखर नेतृत्व मिळालेले आहे त्यामुळे सेनेची  सध्याची स्थिती चांगली दिसतेय. 
          २०१४ ची विधानसभा निवडणूक जी आहे त्या निवडणुकीमध्ये प्रथमच प्रमुख ५ पक्ष स्वतंत्र लढत आहे त्यात शिवसेनेची व भाजपची तुटलेली  युती. पण आता असे दिसून येते कि शिवसेना आणि  मनसे एकत्र येतील असे अनेकदा बातम्यातून व भाषणातून दिसून येते काही दिवसापूर्वी असे वक्तव्य राज ठाकरेने केले आहे कि मी लोकसभा निवडणूक लढणार नाही. याचा सरळ सरळ असा अर्थ होतो हि भविष्यात शिवसेना व मनसे याची युती होणार.  
          विधानसभा निवडणुकीमध्ये जो पक्ष निवडून  येईल तो ५ वर्ष सत्ता करेल मग ज्याची सत्ता त्याचीच वाजेल डंका. भविष्यात महाराष्ट्रात राजकारण कि सत्तेवरील पक्ष यांचे वर्चस्व असेल हे थोड्याच दिवसात कळेल. सध्या जे वातावरण आहे त्यावरून असे लक्षात येते कि कुठल्याही एका पक्षाला महाराष्ट्रात सत्ता मिळणे अशक्य आहे. अशावेळी निवडणुकीनंतर पुन्हा शिवसेना- भाजप सत्ता स्थापन करू शकतात. मात्र मुख्यमंत्री कोणाचा हा पेच महत्त्वाचा असेल. तर दुसरीकडे भाजप राष्ट्रवादी यांचे सरकारची गणित जरी अशक्य वाटत असली तरीही हि नाकारता येणे शक्य नाही. ह्या निवडणुकीत मनसेच्या यशापयशावर हि बरच काही अवलंबून आहे आणि अलीकडच्या काळात शिवसेनेची झालेली जवळीक यातून नवीन राजकारण उदयास आले तर नवल  वाटायला नको. पंचरंगी लढतीत सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली गेली तरी कुणा एका पक्षाला बहुमत मिळण अशक्यप्राय गोष्ट आहे.  

Thursday 9 October 2014

सत्यमेव जयते

                                     सत्यमेव जयते 


              अमीर खानचे व्यक्तिमत्त्व आणि फिटनेस खूप कमालीचा आहे. पण काही दिवसापूर्वी तो आपल्या आगामी चित्रपट पी. के च्या पोस्टर वरून खूप चर्चित झाला. पण त्याने असे सांगितले आहे कि ह्या चित्रपटामध्ये वेगळी काहीतरी पाहायला मिळणार आहे. त्याची उत्सुकता आता सर्वांना लागलेली आहे कि नवीन काही तरी पाहायला मिळणार. तर लवकरच आपण पाहू. 
          पण सध्या अमीर खान हा छोट्या पडद्यावर  पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. ते म्हणजे त्याचा सुपर डुपर  शो सत्यमेव जयते घेऊन. हा शो स्वतः अमीर खानने सुरु केलेला शो आहे. आपल्याला आता असे वाटत असेल कि एवढा  मोठा शो त्याने निर्माण केला आहे. तर तो खूप शिकलेला असेल असा अनेकांच्या मनाला वाटत असेल. पण त्याने त्याच्या पहिल्या सत्यमेव जयतेच्या शोमध्ये स्वतःच्या तोंडून सांगितले कि माझ्याकडे कोणत्याही प्रकारची डिग्री नाही किंवा डिप्लोमा certificate नाही मी फक्त १२ वी पर्यंतच  शिक्षण घेतले आहे. भारतामध्ये खेळाला दुर्लक्ष केले जाते. यामध्ये माध्यम सरकार आणि आपण सर्वच सहभागी आहोत.क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळ भारतात आहेत. याची जाणीव हि आपल्याला नसते हेच आपले दुर्दैव. सत्यमेव जयते या अमीर खानच्या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाची tag line  हि मुमकिन है | ‘ अशी आहे. आणि या पर्वाची सुरुवात क्रीडा क्षेत्रातून केली गेली याबद्दल अमीर खानचे विशेष कौतुक. याचा अर्थ असा कि कमी शिक्षित लोक ही जीवनात खूप पुढे जाऊ शकतात. याच जागत उदाहरणं हे अमीर खान आहे. 
          ५ ऑक्टोंबर पासून सत्यमेव जयते हा कार्यक्रम सुरु झाला. त्यात अमीरखानने खेळाला खूप महत्त्व दिले आहे. आणि हे खरंच आजकालची मुल हि खेळाकडे दुर्लक्ष करताना दिसतात. सध्या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात दिसतो तर सर्वजन तांत्रिक गोष्टीवरच अवलंबून असतात. त्यामुळे खेळ कमी झाला आहे. सत्यमेव जयते या कार्यक्रमात अमीरने खेळ हा विषय ऐरणीवर धरून वेगवेगळे उदाहरण त्याने दिली. त्यात त्याने अखिलेश पॉल या तरुणाचे उदाहरण दिले. अखिलेश हा वयाच्या १४ वर्षापासून व्यसनाच्या आहारी आणि गुंडगिरी करण्यात गेला होता. आणि तो नागपूरच्या रस्त्या रस्त्यावर गुन्हे करत होता. अखिलेश यांची टोळी असायची. हि टोळी कोणालाही मारणे, धमक्या देणे, चोरी करणे, इ. प्रकार करत असत. दारु , गांजा , सिगरेट इ.व्यसन करत असत. तर काही दिवसापूर्वी ते एका महाविद्यालयाच्यासमोर उभे होते. तेव्हा त्या महाविद्यालयामध्ये विजय बरसे सर होते. त्यांनी महाविद्यालयाच्या शिपायांना सांगितले कि त्या मुलांना इकडे बोलून घेऊन ये. तेव्हा त्या मुलांना महाविद्यालयात बोलवले. बरसे सरांनी सांगितले कि तुम्ही फुटबॉल खेळणार का ? हा प्रश्न विचारल्यावर त्या मुलांनी त्यांना वेड्यात काढले.बरसे सर म्हणाले कि मी तुम्हाला तासाचे ५ रुपये देणार. तर ती मुल म्हणाली कि ह्याला वेडबिड लागले तर नाही ना. त्यातलाच एक मुलगा म्हणाला कि अरे सोड जाऊ दे ना  आपल्याला ५ रुपये तर भेटतायत ना मग असू दे आपण खेळू या. असे १० ते १५ दिवस ती मुल खेळली , नंतर ती मुल परत नेहमी प्रमाणे खेळायला निघाली तेव्हा बरसे सर म्हणाले कि आज खेळायचे नाही. तर मुलांनी विचारले कि का नाही खेळायचे तर बरसे सर म्हणाले आज माझ्याकडे पैसे नाही आहेत. तर ती मुल म्हणाली कि पैसे नाही आहेत तर आपण नाही खेळायचे, असे म्हणून ती मुल निघून जातात. तेव्हा त्यांच्यापैकी एक जण म्हणतो कि ठीक आहे ना आज पैसे नाही भेटले म्हणून काय झाले पण आपण खेळूया. असे म्हणून ती मुल फुटबॉल खेळायला जातात. ती मुल परत महाविद्यालयात जातात तेव्हा सर सांगतात कि फुटबॉल घ्या पण परत जागेवर आणून ठेवा. पण हे त्याच्या लक्षात आले नव्हते कि आपण खेळाच्यामुळे व्यसन आणि गुंडगिरी विसरलो आहोत. असे काही दिवस निघून जातात.अखिलेशच्या नावावर अनेक केसेस असतात. तेव्हा त्याचा एक वकील भेटतो. तो त्याला  पी. आई. कडे घेऊन जातो. अखिलेश सरेंडर होतो.काही दिवसांची तो जामीनावर सुटून बाहेर येतो. एक दिवस तो काही मुलांच्या सोबत त्याच्या मागावर गेला ती मुल फुटबॉल खेळायला जात होती. तो एका गाडीच्या बाजूला उभा राहिला त्यांना बघायला लागला. तोचं लांबून एक माणूस येत होता तेव्हा मुल म्हणत होती कि सर आले सर आले. तर ते अखिलेशच्या बाजूला येऊन उभे राहिले. तर अखिलेश त्यांना बघून आवक झाला.ते बरसे सर होते. सर म्हणाले कि कसा आहेस. तेव्हा अखिलेश म्हणतो कि जसा पाहिला होतो तसाच आहे. त्याला सर खेळायला सांगतात. तेव्हा त्याला आपले पहिले जुने दिवस आठवतात. काहीही विचार न करता तो लगेच खेळायला जातो.अखिलेश हा आता एक चांगला फुटबॉल पटू आहे.  तो आता स्वतः एक फुटबॉल कोच आहे. अखिलेश स्टेट आणि national लेवलवर खेळतो. तो अनेक मुलांना फुटबॉल शिकतो. त्याच्या टीम मध्ये जी मुल खेळतात ती गोरगरीब व झोपडपट्टीतील मुल खेळतात.
          दुसरे उदाहरणं हे एका छोट्या मुलाचे दिले गेले होते त्याचे नाव शुभम त्याचे वय ९ वर्ष आहे.तो एक आपल्या वयामध्ये वल्ड गोल्फ champion आहे. शुभमचे घराणे हे कुस्तीपटू होते. पण ह्या मुलाला गोल्फचे वेड होते तो गोल्फचे ६० % शिक्षण हे यु टूब या साईट वरून घेतले होते.शुभमला गोल्फचे ते महागडे सेट परवडणारे नव्हते. पण तरी त्याची त्या खेळातील रुची पाहून त्याला त्याच्या वडिलांनी खूप प्रोत्साहन दिले. शुभम हा आपल्या घरी हरियाणामध्ये शेतात जाऊन गोल्फचा सराव करत असे.तो भांडी ठेऊन सराव करायचा. नंतर त्याला दिल्लीला अमित लूथरा यांनी बोलावले. अमित लूथरा हे गोल्फ फाउंडेशन चालवतात. जगातील सर्वश्रेष्ठ गोल्फ खेळाडू ग्यारी बरोबर २ वेळा खेळला.
          अशा प्रकारे खेळ हा एखाद्या माणसाचे आयुष्य बदलून टाकतो. अशा प्रकारे अनेक उदाहरण अमीर खानने दिली आहेत.
          एक गेंद दुनिया बदल सकती है| जय हिंद सत्यमेव जयते|   

Tuesday 7 October 2014

वक्ता कसा असावा

    

 

 सर्वसाधारणपणे वक्तृत्वाचा अर्थ ‘बोलणे’ असा केला जातो. मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाला काही तरी बोलायचे असते. एवढेच नव्हे तर पशु पक्ष्यांना, झाडावेलींना परस्परांबरोबर विविध विषयांवर बोलायचे असते. आपल्या मनातील खळबळ दुसऱ्या कोणाला तरी सांगायची असते. अर्थात आपल्या मनातला हा भाव दुसऱ्या समोर प्रगट करताना विविध प्रतिमांचा किंवा प्रतिकांचा वापर प्रत्येकजण करत असतो. त्यासाठी विविध प्रकारच्या शब्दांचा , चित्राचा , रंगछटांचा, अंगविक्षेपांचा अवयवांचा, मुद्रांचा, वस्तू वा प्राण्यांचाही उपयोग करून आपण आपल्या मनातील विचार दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. जी माणसे कमी बोलतात त्यांना आपण ‘घुमी’ म्हणतो. तर जी माणसे जास्त बोलतात त्यांना आपण वाचाळ किंवा तोंडाळ म्हणतो. काही माणसे भडाभडा ओक्ल्याप्रमाणे आपल्या मनातले घडाघडा बोलुन ओकून टाकतात, काही आतल्या गाठीची माणसे आवश्यक तेवढेच बोलतात, काही माणसांना विचार करून बोलण्याची सवय असते, काही माणसे आपल्या मनातले बोलून झाल्यावर त्याबद्दल विचार करीत असतात. काही माणसे बोलण्यात पटाईत असतात, काही माणसे बोलताना चतुराईने बोलतात .    

      प्रत्येक जीव आपल्या ज्ञानेन्द्रियाच्या माध्यमातून विविध प्रकारचे अनुभव घेत असतो. पावसाची पहिली सर अंगावर पडल्यानंतर, आकाशामध्ये इंद्रधनुष्याची सुंदर सप्तरंगी कमान दिसल्यानंतर, झुंजूमुंजू झाल्यावर, प्रिया मिलनानंतर, नवनिर्मितीनंतर या व अशा प्रकारच्या आपण घेतलेले अनुभव उत्स्फुर्तपणे हृदयाच्या गाभाऱ्यातून उसळी घेऊन बाहेर येतात आणि त्याला शब्दरूप प्राप्त होते. प्राचीन काळापासून भारतामध्ये १४ विद्या आणि ६४ कला प्रसिद्ध आहेत. प्रत्येक माणूस आपले व्यतिमत्व घडविताना काही विद्या आणि काही कला आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो, ६४ कलांमध्ये गायन, वादन, नृत्य, चित्र, या कलाप्रमाणे वकृत्व कलेचाही समावेश केला जातो.    

 बोलणाऱ्या दहा हजार व्यतीमध्ये एखादाच वक्ता असतो.

कसे बोलावे :-          

        माणसाने कसे बोलावे हि सांगताना संत नामदेव महाराज सांगतात, बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले | म्हणजे आपण अशारितीने बोलावे कि ज्यामुळे प्रत्यक्ष परमेश्वरालाही, विठ्ठलालाही आनंदाने दोलावे असे वाटेल. कीर्तनरंगामध्ये नाचत असताना, न्हाहून निघत असताद्ना सर्वत्र ज्ञानरूपी दिवे उजळले जातील असे बोलावे. आपल्या बोलण्याचा परिणाम म्हणून प्रत्येक्ष परमेश्वराने मान डोलवावी असे वाटत असेल तर त्यासाठी आपली भाषा, आपले शब्द किती चांगले असायला पाहिजेत, प्रभावी असले पाहिजेत, त्यातून कोणत्या प्रकारच्या भावना प्रगट  व्हायला हव्यात याचा विचार आपण सहजपणे करु शकतो. विठ्ठलाचा अर्थ जनता जनार्दन असाही करता येईल .

श्रेष्ठ वक्ता बनण्यासाठी वक्त्याजवळ काही विशेष गुणवत्ता असावी लागते. या गुणांपैकी काही गुणांची वक्त्याला निसर्गतः देणगी मिळालेली असते. तर काही गुण त्याला प्रयत्न करुन्कारून प्राप्त करावे लागतात, विकसित करावे लागतात.
          वक्त्याजवळ कोणते गुण असावेत ते पुढील प्रमाणे . 
  1.  वाचन :-  चांगला वक्ता होण्यासाठी चांगले आणि सतत वाचत राहिले पाहिजे, जो वाचेल तो वाचेल. समर्थ रामदास स्वामी सांगतात "प्रसंगी अखंडित वाचीत जावे ।। काही लोक वाचन करताना पानोपान वाचण्याची सवय असते पण त्यांना थोड्या वेळाने विचारले तर त्यांना काही सांगता येत नाही . वाचन करताना त्याचे वाचनामध्ये मन नसते . त्याचे लक्ष नसते. अशा प्रकारचे वाचन वक्त्याला उपयोगी नसते . 
  2. लेखन :-  श्रेष्ठ वाक्त्याजवळ आवश्यक असणारा हा दुसरा गुण म्हणजे लेखन होय. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, 'दिसामाजी काहीतरी ते  लिहावे। आपण जे वाचतो त्यातले महत्वाचे मुद्दे संपूर्ण संदर्भासह लिहून ठेवावे. म्हणजे आपल्या भाषणाची तयारी करताना आपण जे मुद्दे टाचनवहीमध्ये नोंदवून ठेवले आहेत ते आपल्याला उपयोगी पडतात. वक्त्याने दररोज काही तरी लिहिण्यासाठी सवय ठेवावी. 
  3. हजरजबाबीपणा :- वक्त्याजवळ आवश्यक असणारा तिसरा महत्वाचा गुण म्हणजे हजरजबाबीपणा होय. वक्ता बोलत असताना काही वाचाळ  श्रोत्यांना वक्त्यांच्या भाषणामध्ये मधेच शेरेबाजी करण्याची सवय असते. अशावेळी ती शेरेबाजी विनोद निर्माण करणारी असेल तर सर्व श्रोते शेरेबाजीवर मोठा हास्य निर्माण करतत. अशावेळी वक्त्याची मोठी गडबड उडून जते. पण जर वक्ता हजरजबाबी असेल तर तो त्या शेरेबाजीवर योग्य ती मत करू शकतो. आणि पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांना हसौयाची संधी मिळू शकते. आणि शेरेबाजी करणार श्रोता  गप्प बसतो. मग यापुढे त्या वक्त्याच्या भाषणामध्ये श्रोते शेरेबाजी करण्यापूर्वी १० वेळा विचार करतात. 
  4.  आत्मविश्वास :- श्रोत्यांसमोर उभे राहताना वक्त्याजवळ प्रचंड आत्मविश्वास असायला हवा. बऱ्याच  जणांना आपल्या समोर कोण बसलेले आहेत  म्हणजे  भीती वाटू लागते, बोबडीच वळते. आणि मग तत पप करू लागतात. असे झाल्यावर श्रोते वक्त्याची खिल्ली उडवतात. आत्मविश्वासाच्या अभावामुळे हि अशी अवस्था होते. 
  5. निर्भयता :-  वक्त्याजवळ आवश्यक असणारा पाचवा महत्वाचा गुण म्हणजे निर्भयता हा होय. वक्ता हा वृत्तीने निर्भय असला पाहिजे. इतरांची मते खोडून काढणारा किंवा आपली मते मांडताना वक्त्याने आपला मुद्दा अत्यंत निर्भयपणे आणि ठामपणे मांडला पाहिजे. विशेषतः वादविवादाच्या कार्यक्रमात, स्पर्धात्मक भाषणात जेव्हा श्रोत्यांना आपली मते ठासून  सांगायचे असते. त्यावेळी निर्भयतेची आवश्यकता लाभते त्याचबरोबर सभेमध्ये उपस्थित असलेल्या श्रोत्यांकडे पाहताना, शेरेबाजीला सामोरे जाताना  अशा प्रकारची निर्भयता खूपच महत्वाची ठरते.  
  6. व्यासंग :-  वक्त्याजवळ आवश्यक असणारा एक महत्त्वाचा गुण म्हणजे व्यासंग होय. हा व्यासंग अनेक बाबतीत आवश्यक आहे. वाचन, लेखनाचा व्यासंग असणे हे चांगल्या वक्त्याला आवश्यक आहे. भाषणे, कीर्तने, प्रवचने ऐकण्याचा, त्यातले बारकावे जाणून घेण्याचा, त्याची लकब अभ्यासण्याचा, त्याच्या शैलीचा विचार करण्याचा व्यासंग वक्त्याला हवा.
  7. मुत्सद्दीपणा :-  वरवर पाहता असे वाटते कि मुत्सद्दीपणा या गुणाची प्रामुख्याने राजकारणी लोक आणि वकिलीचा व्यवसाय करणाऱ्यांनाच गरज आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र तसे नसते. ज्यावेळी एकाच विषयावर, एकाच विषयाला धरून आकापेषा जास्त वक्ते विषय मांडणार असतात त्यावेळी किंवा वादविवाद स्पर्धेच्या वेळी अशा प्रकारच्या मुत्सद्दीपणाची नितांत गरज असते. 
  8. विनोदबुद्धी :- समर्थ रामदास स्वामी म्हणतात, 'टवाळा आवडे विनोद ।' असे असले तरी वक्त्याजवळ विनोदबुद्धी असावी लागते. दुसऱ्याने  केलेले विनोद ज्याप्रमाणे आपल्याला कळायला पाहिजे त्याचप्रमाणे त्याच्या विनोदाला योग्य ती दाद दिली गेली पाहिजे हि कला देखील आपल्याला जमायला पाहिजे. ज्याप्रमाणे व्यासंगाची गरज आहे त्याचप्रमाणे विनोदबुद्धीची  हि गरज आहे.
  9. श्रोत्यांची परीक्षा घेण्याचे कसब :-  वक्त्याजवळ श्रोत्यांना समजून घेण्याचे त्याची त्याच्याही नकळत परीक्षा घेण्याचे कसब असावे लागते. वक्त्याला श्रोत्यांची नाडी ओळखता आली पाहिजे. मग वक्ता आपल्या विषयाची योग्य पद्धतीने मांडणी करून मग आपल्या विषयाचा योग्य विचार करू शकतो. त्यासाठी सर्वसाधारण सभेत बसल्यानंतर कोणत्या प्रकारचे श्रोते आले आहे हे पहिले वक्त्याने ओळखले पाहजे. उदा.  श्रोत्यांमध्ये शिकलेले किती ? अशिक्षित लोक किती ? स्त्रिया किती ? पुरुष किती ? वृद्ध किती ? तरुण किती विनोद किती जणांना आवडतो किंवा नाही ? त्याच्या समोर कसे भाषन केले तर आपल्या भाषणाला कशी दाद मिळेल ? अशा विविध प्रश्नाची उत्तरे त्याची त्यानेच मिळविण्याची कसब वक्त्याजवळ असावे लागते. 
  10.  विषयाचे ज्ञान :-   वक्त्यासाठी, वकृत्वासाठी आवश्यक असणारा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे विषयज्ञान होय. शरीरामध्ये ज्या प्रमाणे प्राण महत्त्वाचा त्याचप्रमाणे वक्त्याला आवश्यक असणारा हा गुण होय. ज्या विषयावर आपल्याला बोलायचे आहे त्याचे यथोचित ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे त्या विषयाचे ग्रंथ वाचणे आवश्यक आहे. पुस्तक वाचणे, चिंतन, मनन करणे, अत्यंत आवश्यक आहे.  यासाठी विषयाचा विचार करताना वक्त्याने प्रथम आपला विषय कोणता आहे ते नित समजून घेणे आवश्यक आहे. 
  11. विषय विवरणाची  सवय :-  आपल्या व्याख्यानाचा विषय स्पष्ट करीत असताना वक्त्याने क्रमाने आपल्या विषयातील मुद्द्याचे विवरण करण्याची सवय आत्मसात करायला  हवी. विषय प्रवेश, विषयाची स्पष्टीकरण, त्यासाठी आवश्यक असणारे संदर्भ, विषय परिपूर्ण करणारे मुद्दे आणि अखेरीस स्वमत प्रदर्शन करून त्या विषयाचा योग्यरित्या चिरफाड करता आली पाहिजे म्हणजे श्रोत्यांच्या अनेक शंकांना नकळतच उत्तर मिळते.
  12. विशिष्ट पद्धतीने विचार करण्याची सवय :-  विषय विवरणाची सवय वक्त्याला त्यावेळीच लागते ज्यावेळी आपण विशिष्ट पद्धतीने विचार करू शकतो.वक्त्याने नेहमी सकारात्मक भाषेत बोलले पाहिजे आणि नकारात्मक भाषेत बोलणे टाळले पाहिजे. अर्थात  नकारात्मक बोलणे हे त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. वक्ता जर सकारात्मक विचाराचा असेल जीवनाकडे सकारात्मक दुष्टीने पाहणारा असेल तर स्वाभाविकच त्याचे बोलनेसुद्धा सकारात्मक होते त्याचा परिणामहि चांगला होतो 
  13. भाषणातील गतीचे नियंत्रण :- वक्ता बोलत असताना त्याच्या तोंडून बाहेर पडणारे  शब्द हे विशिष्ट गतीने बाहेर पडत असतात. उदा . अटल बिहारी वाजपेयी बोलत असताना  त्यांच्या दोन शब्दांमध्ये , वाक्यामध्ये भरपूर वेळ असतो .त्यामुळे त्यांचे भाषण अत्यंत शांततेने होते. याउलट शिवाजीराव भोसले ज्यावेळी विषय मांडत असतात त्यावेळी त्यांच्या दोन वाक्यांमध्ये ऐकणाऱ्याला जरा सुद्धा उसंत मिळत नसे. पहिले वाक्य संपले कि लगेचच दुसरे वाक्य उच्चारले जायचे . 
  14. भाषाशैली :- भाषाशैलीचा विचार करताना वक्त्याने आपल्या समोर सुशिक्षित प्रकारचे बसले आहेत ,याचा विचार करणे आवश्यक आहे. सुशिक्षित आणि उच्चविद्याविभूषित लोकांसमोर विषय मांडताना आपली भाषा देखील त्याच प्रकारची म्हणजे अश्या श्रोत्यांना आनंद देणारी असली पाहिजे . श्रोत्यांना दिले जाणारे संदर्भ हे मोठमोठ्या लोकांच्या आयुष्यातील घटकांचे विचारांचे असले पाहिजे .लोकांना इंग्रजी , संस्कृत भाषेतील संदर्भ देणे आवश्यक ठरेल .
  15. आवाज :-   वक्त्याचा आवाज हि त्याला मिळालेली नैसर्गिक देणगी आहे पूर्वी ज्या वेळी ध्वनिक्षेपाकासारखी साधने नव्हती तेव्हा वक्त्याचा आवाज दणदणीत असावा अशी अपेक्षा असायची .वक्त्याने आपले भाषण राणाभीमदेवी थाटात करावे, गर्जना करून करावे असे आचार्य अत्रे म्हणत असत .अश्या वेळी आवाज कमविण्यासाठी विशिष्ट मेहनत घ्यावी लागत असे . आचार्य अत्रे म्हणतात त्यांनी हा आवाज कमविण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. उघड्या माळरानावर जावून दोन्ही गाळात दोन गोट्या किंवा  सागर गोटे ठेवून मोठ्याने ओरडून बोलण्याचा सराव अत्रे करीत असतं त्यामुळे त्यांचा आवाज दणदणीत झाला होता . त्यामुळे माईक नसला तर पाच - दहा हजार लोकांना सहज आवाज ऐकायला जात होता. 
  16. अभिनय :-  श्रोत्याला आकर्षित करून घेण्यासाठी, त्याचे मनोरंजन करण्यासाठी वाक्त्याजवळ आवश्यक असणारा आणखी एक महत्वाचा गुण म्हणजे त्याचा अभिनय . त्याचे अभिनय कौशल्य ,वक्तृत्व हा एक प्रकारे एकपात्री नाट्य प्रयोग आहे . अश्या वेळी भाषणातील आशयाला धरून अभिनय केल्यास त्याच्या भाषणाची लज्जत खूपच वाढते . आपल्या चेहर्याचा योग्य तो वापर वक्त्याने करून घ्यायला हवा . डोळे लहान मोठे करून , चेहऱ्यावरील रेषा लहान मोठ्या करून ,वक्ता श्रोत्यांशी संवाद साधू शकतो, डोळ्यांची भाषा समोरच्या माणसाला पटकन समजते . 
  17. उच्चार :-  वक्त्याचे शब्दोच्चार स्पष्ट आणि स्वच्छ असावेत. उच्चारला जाणारा शब्द योग्य पद्धतीने आणि सुस्पष्ट रीतीने उच्चारला गेला म्हणजे श्रोत्यांना तो नित कळतो. अन्यथा त्यातून महाभारत घडते. 
                    अशा रीतीने प्रत्येक वक्त्याने आपापल्या कुवतीप्रमाणे वक्त्यासाठी आवश्यक गुण आत्मसात करून आपले भाषण अधिकाधिक रंजक आणि परिणामकारक कसे करता येईल याचा विचार करावा. 'केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे', हे ध्यानात ठेऊन प्रत्यक्ष कृती करण्याचा प्रयत्न करावा. भाषण हि कला असून ती कष्टसाध्य आहे.हे ध्यानात घेऊन या क्षेत्रात ज्याला नाव कमवायचे आहे अशा वक्त्याने हि कला आत्मसात करण्यासाठी या सर्वांचा सूक्ष्म अभ्यास करून हि कला आत्मसात करावी .