Saturday 6 December 2014

अभ्यासाच्या सवयी

                                  अभ्यासाच्या सवयी


     माझा अभ्यास का होत नाही ? माझे मन का लागतं नाही ? माझ्या डोक्यात पाठांतर का बसत नाही ? इ. अनेक प्रश्न हे आपले असतात. हे सर्व प्रश्न आता आपले सुटतील. प्रा. आरती पसारकर याचं मानसशास्त्रीय मदतीवर आधारित ' एक हात मदतीचा ' हे पुस्तक आहे. याच पुस्तकातील एक निवडक भाग मी लिहितोय. याचा तुम्हाला पुरेपूर फायदा होईल. 
     बऱ्याचदा असं दिसून येत की विद्यार्थी महत्त्वाच्या परीक्षामध्ये त्यांना हवे तसे गुण मिळवण्यात यशस्वी होत नाहीत. असं ऐकायला मिळत की ' मी खुप अभ्यास केला होता '. पण माहित नाही मला चांगले मार्क्स मिळाले नाहीत. माझं नशीबच ख़राब आहे. शेवटच्या क्षणी मी सगळं विसरलो. पालक ही तक्रार करतात, मुलांची तुलना करतात की माझ्याच मुलाला एवढे कमी गुण का मिळाले ? आणि मग ही पूर्ण चर्चा शैक्षणिक पद्धती वर येउन ठेपते. परिक्षांचा प्रकार, प्रारूप, शाळा - महाविद्यालय, बरोबर शिकवतच नाहीत इ. काही मुद्दे बरोबर ही असतात. परंतु कुठेतरी विद्यार्थ्याची जबाबदारी ध्यानात घेतली पाहिजे. खरं म्हणजे या सर्वांचा मूळ मुद्दा अभ्यास करणं म्हणजेच नुसती घोकंपत्ती किंवा अतिपरिश्रम नसून योग्य पध्दती तत्त्व आणि डावपेचांचा वापर करण होय. हे एक नियोजनबध्द, संघटित आणि उद्देशप्रणित प्रयत्न असले पाहिजेत.
     सुरुवात आपण अशी करुया की तुम्ही काय वाचलंत. त्यातलं किती समजलं आणि आता किती लक्षात आहे? नेपोलियन म्हणालाच आहे की, कुठलही युद्ध जिंकायच्याआधी मी ते माझ्या डोक्यात जिंकलेलो असतो.
     ध्येय निश्चिती :- अभ्यासाला लागायच्या आधी हे नक्की माहित असलं पाहिजे की मी अभ्यास का करतोय? मला नुसतं पास व्हायचंय की चांगले गुण मिळवायचे आहेत ? उदाहरणार्थ, सुरुवातीलाच जर एखाद्या विद्यार्थ्याने असं ठरवलं की मला कमीत कमी 60 टक्के गुण मिळालेच पाहिजे. तर मग हे त्याच्या डोक्यात भिनत आणि त्या प्रमाणे प्रयत्न करतो.हळूहळू हे ध्येयच त्यांची प्रेरणा बनतं आणि मेंदू एक प्रकारचं स्व-सूचना ( ऑटो सजेशन ) देण्याचं काम करतो परंतु या बरोबरच एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या कुवती प्रमाणेच लक्ष निर्धारित करावं म्हणजे ते वास्तवाशी मिळत जुळत असावं अन्यथा यातून वैफल्य येण्याची शक्यता असते
     अभिवृती :- ध्येयप्राप्तीमध्ये सकारात्मक दृष्टिकोण ठेवणं महत्वाचं आहे. मी हे करू शकतो, मला हे करायचं,मी हे करणारचं, परिणामांची  चिंता करत बसण्यापेक्षा ,ध्येय आणि त्यासाठीचे प्रयत्न यावर लक्ष केंद्रित करायला हवं, जर अपयशाचाच विचार करत बसलो. तर मग त्यामुळे चिंता वाढते आणि त्याचा परिणाम आपल्या कामगिरीवर होतो.
     वेळेचं व्यवस्थापन :- अभ्यासाचा  एक तक्ता तयार करावा, असा कि जो तुम्ही अंमलात आणू शकता. विभिन्न विषय आणि त्यासाठी लागणारा वेळ या निकषावर आधारित तक्ता तयार करावा. त्याचप्रमाणे परीक्षेच्या आधीसुद्धा आपल्याला किती विषयांचा किती दिवसात अभ्यास करायचा आहे? रोज आपण किती तास अभ्यास करू शकतो ? सरावासाठी किती दिवस ठेवायचे ? यावर तक्ता बनवू शकतो.
     अभ्यास हीच माझी नोकरी : तुम्ही असं समजा कि एखाद्या शाळेत किंवा महाविद्यालयात तुमची विद्यार्थी म्हणून नेमणूक झाली आहे.अभ्यास हे तुमचं काम आणि मार्क्स हा तुमचा पगार. तेव्हा प्रभावीपणे, कुशलतेने काम करा आणि प्रत्येक पुढच्या परीक्षेत तुमचा पगार म्हणजेच मार्क्स वाढतील असं बघा.हे करत असताना तुम्ही जिथे अभ्यासाला बसणार आहात त्या जागेचा, तेथील प्रकाश, अडथळे, लागणार साहित्य इत्यादीचा विचार करावा .
     अभ्यासात व्हिज्युअलायझेशन, साहित्याची नीट मांडणी, विस्तृत सराव, प्रस्तुतीकरण अशा काही पद्धती वापरता येऊ शकतात. आतापर्यंतच्या अभ्यासाचा आढावा घ्या आणि ठरवा कि अजून किती अभ्यास बाकी आहे ? आणि कुठल्या विषयाच्या अभ्यासाला अजून जास्त तयारीची आवश्यकता आहे?
     अति अध्ययन  ही सुद्धा एक पद्धत आहे. ज्यामुळे विस्मरणाची शक्यता कमी होते.
     नोट्स काढणे : वर्गात शिकत असताना नोट्स घेणं आणि काढणं खूप महत्वाचं ठरत. जेव्हा शिक्षक शिकवत असतात तेव्हा तुम्ही काय करता ? तर त्यावेळेस नोट्स आणि महत्त्वाचे मुद्दे लिहून घेतले पाहिजेत ज्याचा नंतर सुचके म्हणून उपयोग होऊ शकतो.
     परीक्षा : परीक्षा जवळ आल्या कि तुमचा अभ्यास झालेला असला पाहिजे. तुमचं अभ्यासक्रम, महत्त्वाचे प्रश्न, प्रश्नपत्रिका सोडवणं, वेळेत उत्तर लिहिण्याचा सराव हे सर्व केलं  आहे का ? जुन्या प्रश्नपत्रिकावरून तुम्ही स्वतःचा अपेक्षित संच काढू शकता. तुम्हाला हे प्रश्न सोडवता येतात का ? जे कठीण वाटतात त्यांचा पुन्हा निट अभ्यास आणि सराव करावा.
     आता तुम्ही परीक्षेच्या ठिकाणी आहात. आधी प्रश्नपत्रिका नीट वाचा. गरज भासल्यास अजून एकदा वाचा. आता कुठले प्रश्न सोडवणार ते ठरवा. त्याचा क्रम ठरवा. तुमचं पहिलं उत्तर उत्कृष्ट असलं  पाहिजे. प्रत्येक प्रश्नासाठी लागणार वेळ ठरवा आणि त्याप्रमाणे त्या वेळेस प्रश्न पूर्ण होतोय कि नाही ते बघा. कमीत कमी ५-१० मिनिट आधी तुमची सर्व प्रश्नपत्रिका सोडवून झाली असली पाहिजे. या उरलेल्या वेळात सर्व नीट तपासून पहा, काही राहून गेलं असल्यास ते पूर्ण करता येऊ शकतं.
     हे सर्व करत असताना आपली तब्येत सांभाळणं ही तितकंच महत्त्वाचं असतं. बरेचशे विद्यार्थी परीक्षेच्या काळात रात्री जागरण करतात, नीट खात पीत नाहीत आणि पित्ताचा वैगेरे त्रास होतो. यासाठी ही त्रिसूत्री पाळावी.
                   विश्रांती +व्यायाम +आहार
     याशिवाय जसे तुम्ही परीक्षेच्या खोलीत शिरता आणि आपल्या जागेवर जाता, तेव्हा आधी थोडं पाणी प्या आणि मग लागणार साहित्य काढून ठेवा. यश तुमचंच असेल.
     यश मिळण्याची इच्छा, अपयशाच्या भीतीपेक्षा जबर असली पाहिजे.       

No comments:

Post a Comment